शेतकऱ्यांना आधार देणे आपलीच गरज - नाना पाटेकर

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू
नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत.
आम्ही तुमच्या सोबत आहोत. किरकोळ रकमेचा
धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ही
मदत नाही. ही सहानुभूतीही नाही. अनुकंपा तर
नक्कीच नाही. ही आमची गरज आहे, असे
सद्गतीत उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर
यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या विधवांना
आर्थिक मदत करताना येथे काढले..
नाना पाटेकर यांनी भावनिक साद दिल्याने
अनेकांना हुंदका रोखता आला नाही.
पाणावलेल्या डोळ्यांनी उपस्थितांनी
बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा
संकल्प सोडला. औरंगाबाद व जालना
जिल्ह्यातील पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५
हजार रुपयांचा धनादेश व कपड्यांचे वाटप नाना
पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केले.
(प्रतिनिधी)
सगळं संपलं, काय करू ?
हे गेले. मला सासू नाही. सासरा नाही. साडेपाच
वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे.
कुणाचाच आसरा नाही. घर नाही. भाड्याने
राहते. काय खाऊ, कसं राहू? असे म्हणत कविता
सोमनाथ राऊत यांना रडू कोसळले. नाना
पाटेकर यांनी त्यांचे सांत्वन केले.
आम्हा मजुरांचे काय?
मदतीचे वाटप होत असतानाच एक मध्यमवयीन
व्यक्ती थेट धावत मंचावर पोहोचली. हातातील
कागद नाना व मकरंद यांच्या समोर टाकून,
शेतकऱ्यांना मदत व आम्हा मोलमजुरी
करणाऱ्यांना काहीच कसं नाही, म्हणत त्यांनी
टाहो फोडला. मागील तीन वर्षांपासून माझी
पत्नी आजारी आहे. काम करून सर्व कुटुंब पोसतो.
पत्नीच्या आजारासाठी आता पैसा नाही.
वडील मंदिरासमोर भीक मागतात. मला
उपचारासाठी मदत करा, असे ती व्यक्ती
जोरजोराने सांगत होती. त्यांचे वृद्ध वडीलही
त्याच्यापाठोपाठ याचना करीत मंचावर दाखल
झाले. तेव्हा नाना व मकरंदने त्यांना मदतीचे
आश्वासन दिले.
माझ्या पतीने काही खरं केलं नाही. एक आठ
वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी आहे मला.
मुलांचे शिक्षण कसं करू? आम्ही चौघेच आहोत.
त्यांच्या आंधळ्या आईला कसे सांभाळू?


EmoticonEmoticon